समाजसुधारकांची विभागणी का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयन्ती वर्ष म्हणून संघ आणि संघप्रेरित संस्थांनी स्वघोषित विचारवंतांच्या भाषेत सांगायचे तर संघवाल्यांनी बाबसाहेब आंबेडकरांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम वर्षभरासाठी विविध स्तरांवर आखले आहेत आणि यशस्वीरीत्या संपन्नही होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वघोषित विचारवंताच्या पोटात दुखू लागले आहे कि काय असेच सध्या वर्तमानपत्रांद्वारे प्रसिद्ध होणार्या लेखांमधून आणि बातम्यांवरून वाटत आहे. त्याची परिणीती दलित समाजाशी जवळीक साधण्याचा संघाचा प्रयत्न ह्या शीर्षकाखालील बातमी,नरेंद्र जाधवांच्या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवतांनी केले त्या सोहळ्याचा अन्वयार्थ म्हणून वैचारिक लाळघोटेपणा ह्या शीर्षकाखालील संपादकीय लेख इ. संदर्भांतून ठळकपणे जाणवते. नरेंद्र जाधवांचेही ह्या बौद्धिक दहशतवाद्यांनी डॉ. गंगाधर पानतावणे करण्याचे बेत आखलेले दिसतात. असो, अश्या आशयाचे असंख्य लेख आणि व्रुत्त वाचनात आली थोडक्यात बाबसाहेब हे आमचे आहेत तुमचे नाहीत असाच सांगण्याचा खटाटोप हि सर्व मंडळी करताना दिसतात किंबहुना बाबसाहेब आंबेडकरांवर भाष्य करण्याचे अधिकार ह्या हिंदुत्ववाद्यांना नाहीत असा हेकेखोरपणा यातून दिसतो. आपल्या कर्तुत्ववान पुर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या कार्यक्रमांची प्रसारमाध्यम दखलतरी(नकारात्मक का होईना)पण घेत आहेत ह्यातच धन्यता मानून आपण सकारत्मकतेकडे वळूया.
 
संघतत्वप्रणालीचा अभ्यास करता असे लक्षात येते कि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभाविप/संघासाठी संघकार्याच्या आदिकाळापासून पूजनीयच आहेत. रा. स्व. संघ आणि संघप्रेरीत संस्थांच्या इतिहासात याचे संदर्भ आणि पुरावे ठिकठिकाणी सापडतात. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा १९३९ साली पुण्याला संघशिक्षावर्गात प्रवास झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी संघाकार्याविषयी प्रशंसनीय उद्गार काढल्याची नोंद आहे. संघाने समतेच्या केवळ गप्पा न मारता आपल्या आचरणाने जगून दाखविली आहे. संपूर्ण भारतात हे असे एकमेव स्थान आहे जिथे कोण कुठल्या जातीचा याची साधी विचारपूसही केली जात नाही. अशा व्यवहारामुळे बाबासाहेब संघ कार्याप्रती प्रभावित झाले होते हे त्यांनी संघाच्या मुक्तकंठाने केलेल्या स्तुतीवरून लक्षात येतेच. संघाच्या प्रातःस्मरणातही बाबासाहेबांचा उल्लेख आहे. राष्ट्रीय प्रश्न हाताळण्यासाठी आधी राष्ट्रव्यापी संघटन उभे करावे लागते तरच आपण त्या प्रश्नाला योग्य न्याय देऊ शकतो हे संघटन शास्त्रातील सूत्र अभाविप आणि संघ कार्यकर्ते जाणतात. १९८७ साली उद्भवलेल्या रिडल्सवादाच्या जखमा अजून भरून निघालेल्या नाही. त्यावेळेसही संघाचे मुखपत्र म्हणून सर्वदूर ख्याती असणार्‍या साप्ताहिक विवेकमध्ये रमेश पतंगेंचा राम विरुद्ध आंबेडकर: समाज पोखरणारा वाद हा अग्रलेख वाचल्यास आपण निम्न निष्कर्षापर्यंत येऊ १): डॉ. बाबासाहेबांचे प्रकरण चौथ्या खंडातून काढू नये. २) बाबासाहेब हिंदूसमाजाचे शत्रू नाहीत. तसेच संघाने डॉ . बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजाचे मित्र होत शत्रू नव्हेत ह्या शीर्षकाखाली दिनांक १८-१-१९८८ रोजी अधिकृत पत्रक काढून रिडल्सवादात समन्वयकाची यशस्वी भूमिका बजावली होती. १९८१ साली संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधिक सभेत तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरसांच्या उपस्थितीत राखीव जागांचे समर्थन करणारा ठराव सर्वानुमते संमत झाला होता.१९८९ साली आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्षही संघ आणि संघप्रेरीत संस्थांनी देशभर विविध कार्यक्रम घेऊन भारतमातेच्या सुपुत्राचे विचार घरोघर पोहोचवण्याचा विडा उचलला होता. ज्यात सामाजिक समरसता मंच आघाडीवर होता. १९८९ जुल्लैमध्ये मुंबईत महात्मा ज्योतीराव फुले जीवनकार्य या विषयावर समरसता मंचाने परिसंवाद घडविला. १२ एप्रिल १९९१ ला बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळ्याचा समारोप करण्यासाठी मुख्य वक्ता म्हणून रा. स्व. संघाचे सरकार्यवाह रज्जूभैया आणि खासदार अटल बिहारी वाजपयी उपस्थित होते. १९९० साली राममंदिरासाठी कारसेवा चाललेली असताना बाबसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता मंचाने महाराष्ट्रभर संदेश यात्रा काढली होती . अखिल भारतीय स्तरावर कारासेवेसारखा मोठा कार्यक्रम सुरु असताना संदेश यात्रा काढण्याचे धाडस संघ आणि संघप्रेरीत संस्थांनी दाखविले होते. संघासाठी राममंदिरा इतुकाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षाचा विषयही पोटतीडीकीचा होता हे सदर घटनेवरून लक्षात येते.१९९३ साली मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि अशा संकटसमयी संघाने १९ डिसेंबर १९९३ रोजी नामांतर त्वरित व्हावे अशा शिर्षकाचे अधिकृत पत्रक काढून नामांतरास पाठींबा दर्शविला होता.नामांतर झाल्याबरोबर अभाविप च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेर साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. महराष्ट्राच्या तत्कालीन पुरोगामी मुख्यमंत्र्यांना (शरद पवारांना) तुम्ही नामांतर करा दंगली होणार नाहीत , जाळपोळ होणार नाही अशी ग्वाही आणि सोबत हिम्मत कुणी दिली ? त्यावेळेस भाजपच्या मित्रपक्षाला ( शिवसेनेला ) काय वाटेल ? यामुळे राजकीय नुकसान होईल कि फायदा होईल असे धंधेवाईक विचार न करता रा.स्व. संघ आणि अभाविपने बाबासाहेब आंबेडकरांसारख्या राष्ट्रपुरुषाप्रती आदरभाव व्यक्त केला होता.
 

त्यामुळे सदर घटनांचा मागोवा घेता चिकित्सक बुद्धीला हे नक्की लक्षात येईल कि बाबसाहेब आंबेडकर आणि दलित चळवळ हा राजकारण करण्याचा विषय नसून अभाविप आणि संघपरीवारासाठी राष्ट्रगौरवाचा मानबिंदू आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे दलित समाजाशी जवळीक साधण्याचे माध्यम नाही. बाबासाहेबांना विशिष्ट समाजापुर्तेच मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्याची आणि विचारांची श्रेष्ठता अखिल भारतीय स्तरावर प्रकशित झाली पाहिजे कारण बाबासाहेबांनी कायम राष्ट्रहिताचेच रक्षण केले होते.बाबासाहेबांनी राज्यघटना संपूर्ण देशासाठी समदृष्टि ठेवून लिहिली आहे केवळ दलित समाजासाठी नाही. दलितांचा उद्धार करणे हेदेखील राष्ट्रीय कार्यच होते देशात राहणारा प्रत्येक नागरिक समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आला तरच समाज आणि संपूर्ण राष्ट्र बलशाली होईल हे बाबासाहेबांनी ओळखले आणि म्हणून दलितांना आरक्षण दिले त्यांच्या सन्मानासाठी मोर्चे-आंदोलने करीत आपले जीवन व्यतीत केले.केवळ कायदा करून थांबणे योग्य नाही तर दलितांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून केलेले चवदार तळ्याचे आंदोलन ! हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महत्मा गांधींच्या मुस्लिम तुष्टीकरण नीतीला केलेला विरोध. धर्मांतरासाठी भरतभूमितच निर्माण झालेल्या बौद्ध धर्माची निवड करून राष्ट्राची एकात्मता अबाधित ठेवण्याच्या परिपक्वतेचे दर्शन बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून सगळ्या जगाला घडविले. बाबसाहेब आंबेडकरांचे जीवन हे राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पित केलेल्या देशभक्त तपस्वीचे जीवन आहे,शांततामय पण क्रांतीकारक जीवन आहे आणि बाबासाहेबांच्या जीवनातील हे पैलू जोवर समाजासमोर उलघडले जाणार नाहीत तोपर्यंत बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करीत आपली पोळी भाजून घेणार्‍या तथाकथित दलित पुढार्‍यांची दुकाने बंद होणार नाहीत.

संपूर्ण भारतभर डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचे विचार पोहचावे आणि त्या महापुरुषास अपेक्षित असलेला समतायुक्त समरस समाज निर्माण व्हावा हीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघप्रेरीत संघटना करीत असलेल्या कार्यक्रमांमागे शुद्ध भावना आहे हे सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या वाचकाच्या नक्की लक्षात येईल.
 
सोमेश कोळगेपनवेल शहर मंत्री,अभाविप
 
(मुळ लेख - छात्रायण १ ते १५ डिसेंबर)

 

share: 

News

Apr 18 2018
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कठुआ में 8 -वर्षीय बच्ची के साथ हुए दुष्कर्म और...
Mar 16 2018
रुस के राष्ट्रपति चुनाव में अन्तर्राष्ट्रीय पर्यवेक्षक के रूप में अखिल भारतीय...
Mar 03 2018
We have, for long, seen many instances of violence which women had to face. The...
Nov 18 2017
Dr. S. Subbiah  (Chennai) and  Ashish Chauhan (Mumbai)  elected unanimously as...